अकोला: कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला आहे. सप्टेंबर महिन्यात दोन लाखाचे लक्ष ठेवण्यात आले होते. सध्याचा लसीकरणाचा वेग पाहता निर्धारीत ध्येयापेक्षा जास्त लसीकरण होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. लसीकरण मोहिमेची हीच गती कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सुमारे ८० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला असेल, अशी शक्यता देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा जास्त वेगाने फैलाव होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. शिवाय, लसीकरणाचा वेगही वाढविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सप्टेंबर महिन्यात दोन लाख लाेकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आरोग्य विभागातर्फे ठेवण्यात आले होते. निर्धारीत ध्येयाच्या ६० टक्के पहिला डोस, तर ४० टक्के दुसरा डोस अपेक्षित आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे एकूण १४ लाख २४ हजार २६८ उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ लाख ८० हजार २२३ लोकांचे लसीकरण झाले असून, यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख १२ हजार ८२० आहे. लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सुमारे ८० टक्के लोकांनी पहिला डोस घेतलेला असेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असेल. हे लक्ष्य गाठण्यासाठी अकोलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, अशा नागरिकांनी लसीचा पहिला डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.
अशी आहे लसीकरणाची स्थिती
उद्दिष्ट - १४ लाख २४ हजार २६८
झालेले एकूण लसीकरण - ८ लाख ८० हजार २२३
पहिला डोस - ६ लाख १२ हजार ८२०
दुसरा डोस - २ लाख ६७ हजार ४०३
गंभीर रुग्णांची संख्या राहणार कमी
कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोरोनापासून बचाव करण्यास मोठी भूमिका बजावणारी आहे. लसीचा किमान पहिला डोस घेतला तरी कोरोनाचा गंभीर प्रादुर्भाव रुग्णास होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. दिवाळीपर्यंत सुमारे ८० टक्के लोकांनी लसीचा पहिला डाेस घेतलेला असेल, त्यामुळे या काळात कोविडचा प्रादुर्भाव वाढला, तरी आढळणारे रुग्णांना काेविडची सौम्य लक्षणे राहण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यासाठी दोन लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सद्यस्थिती पाहता उद्दिष्टापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणाची स्थिती कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सुमारे ८० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला असेल. शनिवारी लसीचे ४० हजार डोस प्राप्त होणार असून, त्याचा उपयोग सप्टेंबर महिन्यातच केला जाणार आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण,अकोला