अकोला: सरकार व्यापार्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप करीत, शेतकर्यांच्या शेतमालास बाजारमूल्य मिळाले नाही, तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित शेतकर्यांना मोफत कपाशी बियाणे वाटप कार्यक्रमात अँड. आंबेडकर बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार, गटनेता विजय लव्हाळे, सदस्य गोपाल कोल्हे, जमीरउल्ला पठाण, संध्या वाघोडे, रेखा अंभोरे, शबीना खातून सैफुल्लाखाँ, ज्ञानेश्वर सुलताने, बळीराम चिकटे उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीच केले नसून, शेतकर्यांच्या दृष्टीने राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. व्यापारासाठी मार्केट उभारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला; मात्र शेतकर्यांच्या शेतमालास बाजारमूल्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही धोरण ठरविण्यात येत नसल्याचे सांगत, शेतकर्यांच्या शेतमालास बाजारमूल्य न मिळाल्यास लुटारूंच्या फौजा तयार होतील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून अल्पभूधारक शेतकर्यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत असून, या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेत पुढील वर्षी बियाण्यासोबतच खतवाटपाचा समावेश करण्याचा सुतोवाच त्यांनी केला. लागवडीचा खर्च कमी कसा होईल, याच दिशेने यापुढे जिल्हा परिषद वाटचाल करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. अनेक अडथळे पार करून, जिल्हा परिषदमार्फत मोफत बियाणे वाटपाची योजना मार्गी लागली असून, समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेऊन योजना राबविण्यात आल्या पाहिजे, असे विचार आ. बळीराम सिरस्कार यांनी यावेळी मांडले.
...तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील!
By admin | Published: June 24, 2016 12:45 AM