अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरक्षण रोडवरील माधव नगरातील एका घरात चोरट्यांनी हैदोस घालत सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे उजेडात आली. या चोरीची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकाद्वारे चोरीचा तपास सुरू केला आहे. गत महिन्यापासून खदान परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी पोलिसांना खुलेआम आव्हानच दिल्याचे यावरून दिसून येत आहे.माधव नगरातील रहिवासी रमेश माणिकराव वानखडे हे ओरीएंट फायनान्स कंपनीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी ते मुलीला भेटण्यासाठी नागपूर येथे गेले असता, या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात हैदोस घालत ४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये चोरट्यांनी त्यांच्या घराचे तीन दरवाजे तोडल्यानंतर घरातील ३३ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, १५ हजार रुपये किमतीचा कॅमेरा, ३० हजार रुपये किमतीचा दुसरा कॅमेरा यासह सोने व चांदीचे दागिने तसेच रोख असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले. रमेश वानखडे रविवारी रात्री परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसले तसेच घरातील महागड्या वस्तुंसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने खदान पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर पचनामा करून रमेश वानखडे यांची तक्रार घेतली. यावरून चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीनंतर पोलिसांनी तातडीने श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. त्यांनीही तपासणी करून या चोरीचा तपास सुरू केला आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून सतत चोºया होत असल्याने पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; पाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:27 PM