अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली; मात्र त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवण्यात येत असून, उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता खराब असलेल्या २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवली जात आहेत. उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव आता सादर केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
दूषित पाणी पुरवठ्यामुळे निवड झालेली गावेअकोला : आपोती बुद्रूक, बादलापूर, भोड, दहीगाव गावंडे, धोतर्डी, एकलारा, खांबोरा, लोणी, वैराट राजापूर, कापशी रोड. अकोट : कावसा बुद्रूक, लामकाणी, मरोडा, तरोडा. बार्शीटाकळी : मोरगाव काकड, पार्डी. मूर्तिजापूर : लाईत, हातगाव, हिवरा कोरडे, रोहणा, मुंगशी, पारद, लाखपुरी, कोळसरा, सांगवी, शेलू नजिक, टिपटाळा, दापुरा, गुंजवाडा, ताकवाडा, शिरताळा. तेल्हारा : बाभूळगाव, उबारखेड, मनब्दा, नेर, पाथर्डी, सांगवी, सिरसोली, खाकटा, वांगरगाव.
अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बंदग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी असलेली जलशुद्धीकरण संयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, टिटवा कान्हेरी सरप, एरंडा, घोटा येथे जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद आहे. उमरी येथे अद्यापही पुरवठा सुरू झाला नाही. बोरगाव मंजू येथे थकीत देयकामुळे बंद आहे.
यंत्रे परत घेण्यासाठी बजावली होती नोटीसआठ गावांतील संयंत्रे सुरुवातीपासूनच बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्वच ग्राम पंचायतींना अंतिम नोटीसही बजावली होती. त्यामध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची गरज नसल्यास इतर गावांमध्ये बसवण्यासाठी ती परत घेण्यात येतील, याबाबत म्हणणे सादर करण्याचे बजावले होते. त्यावर अद्याप तरी कारवाई झाली नाही.
१० ते २५ पैसे लिटरने पुरवठाग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ग्राम पंचायतींच्या देखरेखीखाली ती चालवली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १० पैसे लिटर, तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लिटरप्रमाणे शुल्क घेतले जाते.