संजयकुमार वानखडे जयंती निमित्त मास्कवाटप
दानापूर: येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सोमवारी सायंकाळी दानापूर प्रेस क्लबच्या वतीने संजयकुमार वानखडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी दानापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय हागे, प्रमोद हागे, महादेव वानखडे, सखाराम नटकूट, शेख राजू, नंदकिशोर नागपुरे, गोपाल विरघट, गौरव वानखडे, सुनीलकुमार धुरडे, धम्मपाल वाकोडे, उपसरपंच साहेबराव वाकोडे, रवींद्र दामधर उपस्थित होते.
फोटो:
प्रवासी वाहनांकडून नियमांची पायमल्ली
चोहोट्टा बाजार: कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. प्रवासी वाहतूक करताना आसन क्षमतेच्या ५० टक्के सूट दिली असतानाही, अकोला-अकोट खासगी बसगाड्या व काळीपिवळी वाहनांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्ककडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
पारस येथे लसीकरणासाठी सर्वेक्षण
पारस: येथील जि.प. प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वेक्षण व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लसीकरणाचा टप्पा वाढावा. यासाठी मुख्याध्यापक गजानन करांगळे, विजय अहिर, विभूती हाडोळे, शीला इंगळे, पद्मा तायडे, आशा गाडगे, सविता खंडारे आदी जनजागृती करीत आहेत.
माती परीक्षणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दानापूर: जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोमवारी सौंदळा येथे शिर्ला येथील सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शेख नदीम शेख अशफाक, प्राचार्य डॉ.राम खरडे, प्रा.गोपाल बेंद्रे, प्रा. पोरे, प्रा.रोहित कनोजे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
भगोरा गाव रस्त्याच्या प्रतीक्षेत
मूर्तिजापूर: मूर्तिजापूरपासून आठ किमी अंतरावरील भगोरा गावासाठी अनेक वर्षांसाठी रस्ताच नाही. अनभोरा ते दुधलम रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भगोरा गावात जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
खासगी प्रयोगशाळांमधील दर निश्चित करा!
बाळापूर: खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळांमध्ये विविध चाचण्या करण्यात येतात, परंतु प्रयोगशाळा चालकांकडून रुग्णाकडून मोठी दर आकरणी केली जाते. गोरगरीब रूग्णांना हे परवडणारे नाही. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांमधील दर निश्चित करण्याची मागणी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केली आहे.
महावितरणमध्ये पदभरती करण्याची मागणी
बाळापूर: महावितरण कंपनीमध्ये विद्युत साहाय्यक पदे भरण्याची मागणी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रविवारी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना, गौरव तायडे, प्रशांत लांडे, स्वप्निल कारंजकर, अमोल इंगळे, अनिल भगत यांचा समावेश होता.
मन नदीतून रेतीची अवैध वाहतूक
बाळापूर: तालुक्यातील लोहारा येथे मन नदीच्या पुलाचे काम काम सुरू असून, कवठा धरणात पाणी अडविल्याने, परिसरातून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
कोरोना लस उपकेंद्रात देण्याची मागणी
वरूर जऊळका: कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत वरूर जऊळका येथील आयुर्वेदिक दवाखान्यात १९ व २३ एप्रिलला १५० जणांना कोरोना लस देण्यात आलीत, परंतु दवाखाना गावाच्या शेवटी असल्याने, अनेकांना लसीबाबत माहीती नाही. त्यामुळे लस आरोग्य उपकेंद्रात देण्याची मागणी नागरिकांनी केली.
कोंडवाडे सुरू करण्याची मागणी
खानापूर: ग्रामपंचायत अंतर्गत येणारे कोंडवाडे सध्या बंद आहेत. कोंडवाडा ही संकल्पनाच हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. गावातील गुरे शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतरही कारवाई करण्यात येत नाही. गुरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्यात येत नाही.