अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमधील स्वच्छता पडताळणी मोहिमेच्या दुसर्या दिवशी केंद्रीय अतिरिक्त आयुक्त (कृषी विभाग भारत सरकार) डॉ. के.पी. वासनिक ग्रामीण भागात पोहचले. शाळांच्या पडताळणीदरम्यान एका शाळेत विद्यार्थी अस्वच्छतेत पोषण आहार घेत असल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहांची पडझड झाल्याचे चित्र दिसून आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळांमधील स्वच्छतेच्या पडताळणीसाठी राज्यातून अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय अतिरिक्त आयुक्त (कृषी विभाग भारत सरकार) डॉ. के.पी. वासनिक हे जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहे. बुधवारी त्यांच्या दौर्याची सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी त्यांनी अकोल्यातील मनपाच्या ३४ शाळांची, तर दोन ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहचून स्वच्छतेबाबत पाहणी केली. यानंतर मोहिमेच्या दुसर्या दिवशी त्यांनी ग्रामीण भागातील शाळांना कुठलीही पूर्व सूचना न देता भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी आकोट तालुक्यातील चोहट्टा, वडाली सटवाई, पाटसूल, रौंदडा आदी ग्रामीण भागातील शाळांना भेट दिली. दरम्यान, चोहट्टा येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत विद्यार्थी खिचडी खाताना आढळून आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या ताटातील खिचडी खाऊन तिचा दर्जा बघितला. पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थी जमिनीवरच बसलेले होते, तर त्यापूर्वी त्यांनी हातदेखील धुतलेले नव्हते. शौचालयाची पाहणी केल्यास तिथे साबण आढळली नसल्याने या ठिकाणी अस्वच्छता असल्याचे आढळून आले. यानंतर तेल्हारा येथील अडसूळ, उमरी या गावातील शाळांची पाहणी केली असता येथे शाळांमधील स्वच्छतागृहांची पडझड झाल्याचे चित्र दिसून आले. तर बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा, लोहारा या ग्रामीण भागातील शाळांचीदेखील पडताळणी यावेळी त्यांनी केली. एकंदरीत ग्रामीण भागातील शाळांमध्ये अस्वच्छता आढळली असून, काही ठिकाणी स्वच्छतागृहांची दुर्दशा तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवली. तसेच शाळा व्यवस्थापनातर्फे विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंबंधी शिक्षण दिल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र या मोहिमेच्या माध्यमातून उघडकीस आले.