सुमारे एक ते दीड वर्षापासून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कायमस्वरूपी अधिकारी मिळाले नाहीत. तीच परिस्थिती बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारीसंदर्भात आहे. दरम्यान, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा प्रभारी पदभार पोलीस निरीक्षक संजीव राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. तर बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा प्रभारी पदभार बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळून पोलीस निरीक्षक आव्हाळे यांना उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा पदभारसुद्धा पाहावा लागत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. अशातच उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर सचिन कदम यांची बुलडाणा येथे त्याच पदावर बदली झाली असून, ते गणेशाेत्सव पार पडल्यानंतर बुलडाणा येथे रूजू हाेणार आहेत़ मात्र बदल्यांच्या या यादीमध्ये अकाेला शहरासाठी कुणाचीही बदली झाली नसल्याने शहराची कायदा व सुव्यवस्था सध्या वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे़
या उपविभागाचा कारभार प्रभारींवर
आकाेट शहर व तालुका जिल्ह्यात संवेदनशील म्हणूण गणला जातो. राज्यातील माेठी जातीय दंगल याच शहरात घडली हाेती. मात्र तरीही येथील एसडीपीओपद गत एक वर्षापासून प्रभारींच्या खांद्यावर आहे. ज्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठविण्यात आले ते रुजू न हाेताच परस्पर बदली करून गेले तर बाळापूरचीही तीच गत आहे. आता अकाेला शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर अद्याप नवीन अधिकारी मिळाला नसल्याचे वास्तव आहे़