लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोरक्षण रोडच्या रुंदीकरणासाठी इन्कमटॅक्स चौकात निर्माण होणाऱ्या ‘बॉटल नेक’चा अडथळा दूर केला जाईल. रस्त्याचे रुंदीकरण करताना कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी स्पष्ट केले. मनपाच्या मुख्य सभागृहात गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारक, व्यावसायिकांसोबत आयुक्त लहाने यांनी गुरुवारी संवाद साधला. यावेळी मालमत्ताधारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. शहरातील गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली असली तरी महापारेषण कार्यालय ते इन्कमटॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या ५०० मीटर अंतरावर काही इमारतींमुळे ‘बॉटल नेक’ निर्माण होण्याची शक्यता होती. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्यासाठी १४ कोटींची तरतूद करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असतानाच इन्कमटॅक्स चौकात निर्माण होणाऱ्या बॉटल नेकमुळे भविष्यात गोरक्षण रोडवर वाहतुकीची समस्या कायम राहण्याची चिन्हं होती. यासंदर्भात लोकमतने सतत पाठपुरावा केला असता लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्या बैठकीत इन्कमटॅक्स चौकातील इमारतींचे अतिरिक्त बांधकाम दूर करण्याविषयी एकमत करण्यात आले. मनपाच्या नगररचना विभागाने महापारेषण कार्यालय ते इन्कमटॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या ५०० मीटर अंतरावरील निवासी घरे, व्यावसायिक संकुल, दुकानांची ‘मार्किंग’केली. संबंधित मालमत्ताधारकांच्या मनातील असंख्य प्रश्न, शंकांचे निरसन करण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मुख्य सभागृहात मालमत्ताधारकांसोबत बैठकीचे आयोजन केले. रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या मालमत्तांचे अतिरिक्त बांधकाम हटविल्या जाईल. त्या बदल्यात संबंधित मालमत्ताधारकाला ‘टीडीआर’ उपलब्ध करून दिला जाईल. रस्त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे आयुक्त लहाने यांनी स्पष्ट केले. बैठकीला नगररचनाकार प्रणय करपे, संदीप गावंडे यांच्यासह गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारक उपस्थित होते.शहर तुमचे, नियोजन आमचे!आपले शहर सुंदर असावे, अशी भावना अपेक्षित आहे. या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी दिशाभूल करून तुम्हाला अनधिकृत सदनिका, दुकानांची विक्री केली. तुम्हीदेखील खातरजमा न करता मालमत्तांची खरेदी केली. त्यामुळे शहरात अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट झाला. सर्व्हिस लाइन, मुख्य रस्त्यांची जागा बळकावण्यात आली. शहर तुमचे असले तरी त्याचे काटेकोर नियोजन करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे आयुक्त अजय लहाने यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामाचा मोबदला कसा?विकास आराखड्यानुसार गोरक्षण रोड २४ मीटर रुंदीचा आहे. ही माहिती असूनही के्रडाईच्या काही पदाधिकाऱ्यांनी इन्कमटॅक्स चौकात टोलेजंग व्यावसायिक संकुल उभारले. यांसह परिसरातील हॉटेल, दुकानांचे बांधकाम अतिरिक्त ठरणार आहे. नियमांना धाब्यावर बसवत केलेल्या बांधकामांना निश्चितच तोडल्या जाईल. अशा बांधकामांचा मोबदला कसा,असा प्रश्न उपस्थित क रीत आयुक्त लहाने यांनी नियमानुसार बांधकाम करणाऱ्यांना मोबदला दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
गोरक्षण रोडच्या रुंदीकरणात तडजोड नाही
By admin | Published: June 02, 2017 2:01 AM