काॅंग्रेसकडून यादीच नाही, समित्यांची घाेषणा लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 10:39 AM2021-08-03T10:39:22+5:302021-08-03T10:39:49+5:30
Political News : समित्यांवर सदस्यांची नावे देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडून नावे मागितली हाेती.
- राजेश शेगाेकार
अकाेला : शिवसेनेच्या नेतृत्वातील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारची दाेन वर्षांकडे वाटचाल सुरू असतानाही जिल्हयातील विविध समित्यांची घाेषणा झालेली नाही. पालकमंत्र्यांच्या संमतीने जाहीर हाेणाऱ्या या समित्यांवर सदस्यांची नावे देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडून नावे मागितली हाेती. मात्र, काॅंग्रेसकडून नावांची यादीच प्राप्त न झाल्याने समित्यांवरील नियुक्ती रखडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्तेचा वाटा जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांनाही मिळावा यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विविध समित्या गठीत केल्या जातात. तब्बल १०६ समित्यांमध्ये कार्यकर्त्यांना सामावून घेताना अशासकीय सदस्य म्हणून त्यांना सन्मान मिळताे. प्रशासनाच्या विविध विभागांमधील कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेऊन एकप्रकारे प्रशिक्षण देण्याचा हा प्रयत्न असताे. या समित्यांवर वर्णी लागणे हे कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचे तसेच त्यांच्या कामाची नेत्यांनी दिलेली पावती समजली जाते. त्यामुळे या समित्यांच्या घाेषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले असते. अकाेल्यातही अशा समिती गठीत करण्याची प्रक्रिया पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या स्तरावर सुरू केली हाेती. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना व प्रहार अशा चारही पक्षांच्या सदस्यांना या समितीमध्ये स्थान देण्यासाठी जिल्हाध्यक्षांसाेबत चर्चाही आटाेपली हाेती. त्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना व प्रहारकडून सदस्यांची नावे अंतिम करून पालकमंत्र्यांच्या मंजुरीसाठी याद्याही पाठविण्यात आल्या. फक्त काॅंग्रेसकडून काेणतीही यादी न आल्याने समित्यांची घाेषणा लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या त्रांगड्यात अडकल्या समित्या
काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्षपदावर नव्या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता गेल्या दीड वर्षापासून व्यक्त केली जात आहे. पक्षश्रेष्ठींनीही वेळाेवळी चाचपणी करून अध्यक्ष बदलण्याबाबत संकेत दिले हाेते. त्यामुळे इच्छुकांनी चांगलीच लाॅॅबिंग सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या दाैऱ्यानंतर त्याला वेग आला आहे. अध्यक्ष निवडीचे त्रांगडे कायम असल्यानेच समित्यांसाठी नावांची यादी तयार झाली नाही अशी चर्चा काॅंग्रेसच्या वर्तुळात आहे.
तर काॅंग्रेस वगळून समित्या जाहीर हाेतील
जिल्हा व तालुकास्तरीय समित्या जाहीर करण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी व प्रहारकडून पालकमंत्र्यांकडे कार्यकर्त्यांचा सातत्याने तगादा सुरू असल्याने अखेर काॅंग्रेसच्या संभाव्य जागा रिक्त ठेवून समित्या जाहीर करण्यासाठी शिफारस हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.