अकोला, दि. २४- जिल्ह्यातील पाचही नगरपालिका निवडणुकांचा बिगुल खर्या अर्थाने २४ ऑक्टोबरपासून वाजला असून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. इच्छुक उमेदवारांनी पहिल्या दिवशी माहिती घेणेच पसंत केल्याने अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा आणि पातूरमध्ये एकही नामांकन दाखल झाले नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढणार आहे.इच्छुक उमेदवार नगर परिषदेचा कंत्राटदार नसावा, अशी अट ठेवण्यात आल्याने अनेकांची दुकानदारी थांबणार आहे; मात्र त्यातूनही पळवाट शोधण्याची तयारी सुरू असल्याची महिती आहे. तेल्हारा नगरपालीकेसाठी इच्छुकांनी सावध भूमिका घेत केवळ माहिती गोळा केली. त्यामुळे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मोहन अकोटकर यांनी सांगितले. बाळापूरातही नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. नामांकन ऑनलाइन असल्याने येणार्या अडचणी व नियमावली पाहता अनेकांनी कार्यालयात चौकशी करून माहिती घेतल्याचे नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. किर्दक यांनी सांगितले. मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक राहिला. २४ ऑक्टोबर रोजी एकही अर्ज दाखल झाला नाही. मूर्तिजापूर नगराध्यक्षासह २३ नगरसेवक पदासाठी २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरून नामांकन अर्ज दाखल करायचा असल्याने पहिल्या दिवशी इच्छुकांनी माहितीच घेतली. येत्या काही दिवसांत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे असाच प्रकार पातूर मध्ये आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. राजकीय पक्ष आपापले उमेदवार जुळवण्याच्या कामाला लागले आहेत. कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार आपल्याला सोयीचा ठरेल, याची चाचपणी सुरू आहे. तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणे सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अनेक जण अपक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. संकेतस्थळावर अर्ज अपलोड झाले नाहीतआकोट नगर परिषद निवडणुकीत नामांकन भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज प्राप्त झाले नाही. विशेष म्हणजे अनेकांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता नेटकॅफे गाठून नामांकन भरून अपलोड करण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित संकेतस्थळावर अर्ज अपलोड होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात नेटकॅफे चालकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गीता ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनीही राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्याची माहिती आहे. २५ तारखेपासून संबंधित संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल होतील असे त्यांनी नेटकॅफे चालकांना सांगितले.
पहिल्या दिवशी एकही नामांकन नाही
By admin | Published: October 25, 2016 3:04 AM