रोहनखेड : येथून चार किमी अंतरावर असलेल्या कुटासा गाव अकोट तालुक्यात मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या १५ हजाराच्या जवळपास आहे. परंतु गावात पोलीस चौकी नाही. दीड वर्षापासून पोलीस चौकीचा कारभार पोलीस ठाण्यातूनच चालत आहे. गावात अनेक अवैध धंदे फोफावले असून, त्याचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे.
काही वर्षांपूर्वी गावात लहान मुलांसाठी पाळणाघर होते. गावातील महिला शेतामध्ये कामाला गेल्या, की महिला मुलांना त्या पाळणाघरात सोडू द्यायच्या. परंतु नंतर पाळणाघर बंद पडले. गावातील ग्रामपंचायतने पाळणाघर पोलीस चौकीला दिले. त्यामुळे गावात ४० ते ५० वर्षांपासून पोलीस चौकी होती. कुटासा पोलीस चौकी अंतर्गत पुंडा, रोहनखेड, बांबर्डा, जऊळका, कावसा, दिनोडा ही गावे येतात. गावांचा कारभार पोलीस चौकीतून चालत असे. मात्र कुटासा गावात रस्त्याच्या रुंदीकरणात पोलीस चौकीचा अर्धा भाग रस्त्यामध्ये गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकीचे अतिक्रमण पाडले. कुटासा येथे गत दीड वर्षापासून पोलीस चौकी नाही. त्यामुळे १० खेड्यांतील नागरिकांना रात्री-बेरात्री तक्रार नोंदविण्यासाठी दहीहांडा पोलीस स्टेशन गाठावे लागते. दहीहांडा पोलीस स्टेशन दूर असल्याने अधिकचे भाडे खर्च करावे लागते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाने लक्ष देऊन कुटासा गावात पोलीस चौकी उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गावात पोलीस चौकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली. ग्रामपंचायतमार्फत मी स्वतः दहीहांडा पोलीस पोलीस स्टेशनला पाठपुरावा केला. परंतु अद्यापपर्यंत नवीन पोलीस चौकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही.
-विजयसिंग सोळंके, माजी समाजकल्याण सभापती, कुटासा
कुटासा येथील नवीन पोलीस चौकीसाठी निधी द्यावा, असा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविल्याची मला माहिती नाही. सध्या पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात बसतात. पोलीस चौकी बांधकामाचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येईल.
-प्रकाश अहिरे, ठाणेदार पोलीस स्टेशन दहीहांडा