अकोला : माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही कोरोना विषाणू आढळू शकतो, मात्र त्यापासून प्राण्यांना कुठला आजार झाल्याचे निदर्शनास आले नाही. शिवाय, प्राण्यांपासून माणसाला कोरोनाची लागण झाल्याचे एकही उदाहरण समोर आले नसल्याने पाळीव प्राण्यांपासून माणसाला कोरोनाचा धोका नाही, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी दिली. मात्र, महामारीच्या काळात खबरदारी म्हणून पाळीव श्वानांना ‘सेव्हन इन’ ही लस द्यावी, असे आवाहनही डॉ. बावणे यांनी लोकमतशी बोलताना केले.
सद्य:स्थितीत सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असून एकापासून अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असताना पाळीव प्राण्यांनाही त्याचा धोका असू शकतो का? प्राण्यांपासून माणसांना काेरोनाची लागण होऊ शकते का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी लोकमतने जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, प्राण्यांपासून माणसाला कोरोनाची लागण झाल्याची एकही घटना समोर आली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू आढळू शकतो, मात्र त्यापासून त्यांना आजार झाल्याचे आजपर्यंत आढळले नाही. यावर जगभरात संशोधन सुरू आहे. प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू आधीपासूनच आहे, मात्र त्यापासून प्राण्यांना कुठलाच आजार झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्राण्यांपासून माणसांना धोका नसल्याचे त्यांचे मत आहे. पाळीव प्राणी विशेषत: श्वान आणि मांजरींना विषाणूजन्य आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लस देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मांजरीसाठी कोरोनाची स्वतंत्र लस
श्वानांना विविध प्रकारच्या विषाणूंसाठी ‘सेव्हन इन’ लस दिली जाते, मात्र मांजरींसाठी कोरोनाची स्वतंत्र लस असून आधीपासूनच त्याचा उपयोग केला जात असल्याची माहितीही डॉ. बावने यांनी यावेळी दिली.
प्राण्यांमध्ये विविध विषाणूंप्रमाणेच कोरोना विषाणूही आढळू शकतो. मात्र, या विषाणूंपासून आजार निर्माण होत नसल्याने प्राण्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे प्राण्यांपासून माणसांना कोरोनाचा धोका नाही. असे असले, तरी या विषाणूंपासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. श्वानांसाठी ‘सेव्हन इन’ ही लस द्यावी, तर मांजरींसाठी पूर्वीपासूनच कोरोनाची स्वतंत्र लस आहे, ती देखील मांजरींना द्यावी.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला