स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी (अकोला) : कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. विदर्भ-मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या पत्नींच्या कपाळावरील कुंकु कायमचे पुसले गेले आहे, अशा संवेदनशिल मुद्यांवर चर्चा व्हायला हवी असताना टीकलीसारख्या निरर्थक विषयांना महत्व दिले जात असल्याचा संताप लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेद्वारे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.वाशिम मार्गावरील प्रभात किड्स स्कुलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. बाजीराव पाटील साहित्यनगरीत दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास शनिवारी (दि.५ नोव्हेंबर) थाटात सुरुवात झाली. स्व. विशाल डिक्कर स्मृती साहित्यपीठात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मंचावर संमेलनाध्यक्ष अरविंद जगताप, उद्घाटक युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, अमरावती विभागीय आयुक्त तथा साहित्यीक दिलीप पांढरपट्टे, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक डॉ. रविंद्र शोभने, अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल, संमेलन सरचिटणीस अशोक डेरे, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे (रोठे), संमेलन चिटणीस प्रा.डॉ. सुहास उगले, सहकार्यवाह डॉ. विनय दांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अरविंद जगताप म्हणाले की, अलीकडच्या काळात बोलणे कमी होत आहे. प्रश्न विचारणे कमी होत आहे. त्याची जागा आता निरर्थक चर्चांनी घेतली आहे. समाजमाध्यमांवर नाहक चर्चा करताना आपल्याला कुंकु पुसल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे दुख: दिसत नाही, हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असे जगताप म्हणाले. यावेळी त्यांनी राजकीय नेते व त्यांच्या समर्थकांनाही चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सर्वच पक्षाचे नेते एकत्र येतात मात्र त्यांचे समर्थक परस्परात भांडतात. कोणताही नेता आपल्या समर्थकाला खांद्यावर घेत नाही. त्यामुळे समर्थकांनी नेत्यांच्या दावणीला बांधल्यासारखे वागू नये, असेही जगताप म्हणाले.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. यावेळी रविंद्र शोभने, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, प्रमुख अतिथी रणधीर सावरकर, प्रदीप दाते, दिलीप पांढरपट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. सीमा शेटे यांनी शुभेच्छा संदेशांचे वाचन केले. संचालन ॲड. वल्लभ नारे, तर आभार प्रदर्शन विजय कौसल यांनी केले.