संतोष येलकर
अकोला: तूर आणि उडिद डाळीचे दर सतत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात तूर व उडीद डाळींचा काळाबाजार होता कामा नये, त्यासाठी कृत्रिम साठेबाजीवर कटाक्षाने लक्ष ठेवून, डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या त्रिसदस्यीय पथकाने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह दालमिल मालक, घाऊक विक्रेते आणि अडत्यांच्या बैठकीत शनिवारी अकोल्यात दिले.गेल्या काही दिवसांपासून तूर आणि उडीद डाळींचे दर सतत वाढत असल्याने, डाळींचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथील उपसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक शनिवार, १५ एप्रिल रोजी अकोला दौऱ्यावर आले.
या पथकाने प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह दालमिल मालक, घाऊक विक्रेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदी करणारे व्यापारी व अडत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये तूर व उडीद डाळींची कृत्रिम साठेबाजी होत आहे का, याबाबतची शहनिशा करीत, संबंधित डाळींचा काळाबाजार होता कामा नये, त्यासाठी कृत्रिक साठेबाजी होणार नाही, यासंदर्भात खबरदारी घेवून डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने या बैठकीत दिले. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसह जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू.काळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल पळसपगार यांच्यासह दालमिल मालक, घाऊक विक्रेते, बाजार समितीमधील व्यापारी, अडते उपस्थित होते.
डाळींच्या दैनंदिन व्यवहाराची नोंदणी ऑनलाइन पोर्टलवर करा !तूर व उडीद डाळींच्या दैनंदिन खरेदी व विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी केंद्र शासनाच्या संबंधित पोर्टलवर आॅनलाइन पध्दतीने करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने दालमिल मालक व घाऊक विक्रेत्यांना या बैठकीत दिल्या.