काय म्हणतात कोविड योद्धे?
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होईपर्यंत केवळ त्याबद्दल ऐकले होते, मात्र ७ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर सर्वांमध्येच भीतीचे वातावरण होते. कर्तव्याला प्राधान्य देत सर्वच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा दिली. आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सहकार्याने जीएमसी आतापर्यंत कोविडविरुद्धचा लढा यशस्वी लढत आहे. त्याचेच फलित म्हणजे कोविडच्या सर्वांत कमी मृत्युदरामध्ये अकोला जीएमसी दुसऱ्या स्थानी आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्र. अधिष्ठाता, जीएमसी, अकोला
कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच जीएमसीत रुग्णसेवेच्या तयारीला सुरुवात झाली होती. सुरुवात १० खाटांच्या वाॅर्डपासून झाली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविडबद्दल मार्गदर्शन देणे सुरू झाले. ७ एप्रिल रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. हा आजार पूर्णत: अनोळखी असतानाही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत कोविडविरुद्धचा लढा सुरू ठेवला.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन विभाग, जीएमसी, अकोला
आईला फुप्फुसांचा आजार असल्याने मागील दोन वर्षांपासून ती घरातच ऑक्सिजनवर होती. याच दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्णसंख्या वाढल्यानंतर नव्या वॉर्डाची जबाबदारी माझ्यावर आली. एकीकडे आई आणि दुसरीकडे रुग्णसेवेचे कर्तव्य दोन्ही एकाच वेळी सांभाळावे लागले. आपण जगू की नाही, अशी भीती होती. दरम्यान, आईचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण वेळ रुग्णसेवेसाठी समर्पित केले. यामध्ये सहकारी ताज खान यांचे मोठे सहकार्य मिळाले.
- प्रकाश नवरखेडे, पुरुष अधिपरिचारिका, जीएमसी