अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट आता झपाट्याने ओसरत असून, दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूच्या आकडेवारीत कमालीची घट झाली आहे. बुधवार, १६ जून रोजी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर १७२४ चाचण्यांमध्ये केवळ ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकूण बाधितांचा आकडा ५७२६० झाला आहे, तर कोरोनाबळींची संख्या १,११६ वर स्थिर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅकडून बुधवारी एकूण ९१६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९०० अहवाल निगेटिव्ह आहेत. मंगळवारी दिवसभरात ८०८ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. त्यामध्ये केवळ २१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. अशा प्रकारे गत २४ तासांत १७२४ चाचण्यांमध्ये केवळ ३७ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाची लाट ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. आरटीपीसीआर चाचण्यांतध्ये पॉझिटिव्ह आलेल्या १६ जणांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील एक, बाळापूर-एक, पातूर-एक, तेल्हारा-एक व अकोला मनपा क्षेत्रातील १२ जणांचा समावेश आहे.
१७२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, खासगी कोविड रुग्णालयांमधील २०, तर होम आयसोलेशन मधील १४८ अशा एकूण १७२ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.