अकोला : दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने गुजरात राज्यातील ओखा ते तामिळनाडूतील मुदराई या दोन स्थानकांदरम्यान १० जुलैपासून साप्ताहिक विशेष गाडीच्या अप व डाऊन अशा प्रत्येकी ४ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अकोला - पूर्णा मार्गे जाणार असून, अकोला स्थानकावर या गाडीला थांबा असणार आहे.
रेल्वे सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९५२० ओखा - मदुराई साप्ताहिक विशेष १० जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत दर सोमवारी ओखा स्थानकावरून रात्री २२:०० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी २२:१५ वाजता अकोला स्थानकावर येईल. ही गाडी चौथ्या दिवशी ११:४५ वाजता मदुराई स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०९५१९ मदुराई - ओखा साप्ताहिक विशेष गाडी १४ जुलै २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दर शुक्रवारी मदुराई स्थानकावरून रात्री १:१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १०:०० वाजता अकोला स्थानकावर येईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला अहमदाबाद, सुरत, जळगाव, अकोला, पुर्णा, काचीगुडा, ढोणे, रेणीगुंटा आदी स्थानकांवर थांबा आहे.
तांबरम - धनबाद स्पेशलची एक फेरी
तामिळनाडू येथील तांबरम येथून झारखंडमधील धनबाद येथे जाण्याकरिता (०६०७७ / ०६०७८ तांबरम - धनबाद - तांबरम) विशेष गाडीची एक फेरी ३० जून ते ४ जुलै या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. ०६०७७ तांबरम - धनबाद विशेष गाडी शुक्रवार, ३० जून रोजी रात्री २२:०० वाजता रवाना होऊन सोमवारी सकाळी ०५:३० वाजता धनबाद येथे पोहोचेल. ०६०७८ धनबाद - तांबरम विशेष गाडी मंगळवार, ४ जुलै रोजी दुपारी १५:३० रवाना होऊन गुरुवार, ६ जुलै रोजी तांबरम येथे पोहोचेल. या गाडीला अकोला येथे थांबा असून, ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असेल.