अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशनकार्ड धारकांना महाराष्ट्र दिनापासून मोफत धान्याचे वाटप सुरू केले. त्यामध्ये आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही सवलतीत धान्य देण्याची घाेषणा करण्यात आली आहे. अकाेल्यात १ जूनपासून या धान्याचे वितरण केले जाईल, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थाअंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब रेशनकार्ड धारकांना मोफत धान्याचे वितरण १ मेपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तसेच अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशनकार्ड धारकांना प्रति कुटुंब २० किलो गहू व १५ किलो तांदूळ आणि प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांना प्रति कार्ड एक किलो याप्रमाणे हरभरा किंवा तूर यापैकी एक डाळ, असे मोफत धान्याचे वितरण हाेत आहे. आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही सवलतीत धान्य मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे काेराेना काळात धान्यापासून काेणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासनाने घेतली आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी रेशनकार्डधारक
बीपीएल : ७०,९३९
अंत्योदय : ४४,८४७
केशरी : १,०६,८१७
काय मिळणार...
एक किलाे गहू
एक किलाे तांदूळ
केशरीच्या १ लाख लाभार्थ्यांना हाेणार फायदा
प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाेबतच आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही सवलतीत धान्य मिळणार असून अकाेल्यातील १ लाख ६ हजार ८१७ लाभार्थ्यांना धान्य मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व शेतकरी याेजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळाला नाही, अशा केशरी शिधापत्रिका धारकांनाही सवलतीत धान्य देण्याची याेजना सरकारने सुरू केली आहे. अकाेल्यात या घटकातील लाभार्थ्यांना १ जूनपासून धान्याचे वितरण केले जाणार आहे. याबाबत नियाेजन सुरू आहे.
- बी. यु. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकाेला