अकोला: सध्या केंद्र आणि राज्य सरकारने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे; मात्र प्रत्यक्षात सध्याची शिक्षण पद्धती बघता आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे अशक्य असल्याचे दिसते. पुढील दहा वर्षांत लागणारे आवश्यक मनुष्यबळ आणि प्रत्यक्षात तयार होणारे मनुष्यबळ यातील तफावत बघता ४८ लाख कुशल कामगारांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. याकडे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. राज्यातील सध्याच्या कौशल्य विकास शिक्षण पद्धतीत त्यासाठी आवश्यक बदल करण्याबाबत काही सूचनाही त्यांनी या पत्रातून केल्या आहेत. जगात सर्वात कमी कुशल मनुष्यबळ भारतात आहे. जगात चीनमध्ये ४८ टक्के, अमेरिकेकडे ५८ टक्के,र्जमनीत ७0 टक्के, कोरियात ९६ टक्के आणि ब्रिटनमध्ये ६८ टक्के कुशल मनुष्यबळ आहे. भारतात मात्र एकीकडे सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असलेला देश असतानाही अकुशल मनुष्यबळाचाच त्यात अधिक भरणा असल्याने विकासात येणार्या अडचणीबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यासाठी कौशल्य विकास करणार्या शिक्षण पद्धतीवर भर द्यावा लागेल, असे डॉ. खडक्कार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात पुढील दहा वर्षांमध्ये १.५ कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीचा विचार केल्यास या काळात राज्यातील विद्यापीठांमधून १ कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. उर्वरित ४८ लाख मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान महाराष्ट्र सरकारपुढे राहील. हा तुडवडा कसा भरून काढता येईल, याबाबत आतापासूनच सरकारने विचार करणे आवश्यक आहे. देशात उच्च शिक्षण देणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे २0१0 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद आहे.
दहा वर्षात ४८ लाख कुशल मनुष्यबळाचा तुटवडा भासणार!
By admin | Published: April 29, 2016 2:07 AM