अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे १३ सप्टेंबरला होत असलेल्या नीट परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शारीरिक तापमानाची तपासणी करण्यात येणार असून, प्रत्येक वर्गखोलीमध्ये एका निरीक्षकांच्या देखरेखीखाली केवळ १२ विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर हात धुण्याकरिता ठिकठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबणाची व्यवस्था करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोना विषाणू संसर्गामुळे यावर्षी नीट परीक्षा घेणे अवघड झाले होते. या परीक्षेवरून केंद्र व राज्य सरकारमध्येही वादंग निर्माण झाला होता. अखेर ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेस टेस्ट-२०२०’ परीक्षा घेण्याचा निर्णय झाला व ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना परीक्षा केंद्रावर करण्यात आलेल्या आहेत. गर्दी होऊ नये, केंद्रावर प्रत्येक वेळी उमेदवारांना एकमेकांपासून कमीत कमी सहा फूट जागा राखणे आवश्यक करण्यात आले आहे. उमेदवारांनी केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुऊन स्वच्छ केले पाहिजे, यासाठी परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबण ठेवावे लागणार आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान थर्मल गन्स वापरून तपासले जाणार आहे. केंद्र कर्मचारी ही तपासणी करणार आहेत. तर वेगळ्या कक्षात परीक्षाउमेदवारांचे शरीर तापमान तपासण्यासाठी नोंदणी कक्षात थर्मल गन उपलब्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या शरीराचे तापमान कोविड-१९ मानदंडापेक्षा जास्त असेल, तर उमेदवारास स्वतंत्र खोलीत किंवा वेगळ्या कक्षात बसविल्या जाणार आहे. केंद्राचे निर्जंतुकीकरणआसन क्षेत्राची पूर्णपणे स्वच्छता केली जाणार आहे. सर्व दाराचे हॅण्डल, जिना रेलिंग, लिफ्ट बटणे यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक केले आहे. व्हिलचेअर्स असेल तर त्याचेही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना परीक्षा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. वर्ग खोलीची रचना पाहून ठरेल विद्यार्थी संख्यानीट परीक्षा देताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी एका वर्ग खोलीत एका प्राध्यापकाच्या निरीक्षणात केवळ १२ विद्यार्थी बसविले जातील. वर्ग खोली मोठी असेल तर २४ विद्यार्थी व त्यासाठी आणखी एक प्राध्यापकाची नियुक्ती परीक्षा घेण्यासाठी केली जाणार आहे. शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर ६६० परीक्षार्थीसांठी आम्ही परीक्षेची पूर्ण तयारी केली. सर्व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण केले असून, सर्व सूचनांचे पालन करण्याची व्यवस्था केली आहे.-डॉ. रामेश्वर भिसेप्राचार्य शिवाजी महाविद्यालय, अकोला
‘नीट’च्या विद्यार्थ्यांचे होणार थर्मल स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:15 PM