अकोला: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत २0१९-२0 मध्ये रिसर्च बुलेटिन अंक प्रकाशित करण्यात येणार आहे. या रिसर्च बुलेटिनसाठी डायट व शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, प्राध्यापकांकडून संशोधनावर आधारित शोधनिबंध मागविले आहेत. अनेकदा प्राध्यापक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी एमफील, पीएचडी या पदव्यांसाठी विद्यापीठांकडे संशोधन शोधप्रबंध सादर करतात. गत तीन वर्षांमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयामधील अधिकारी, शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हा स्तर, राज्य स्तरावर देण्यात आलेले संशोधन विषय तसेच पीएचडी, एमफील या पदवीसाठी विद्यापीठात सादर केलेल्या संशोधनावर आधारित शोधनिबंध मुद्यांना अनुसरून स्वतंत्रपणे लिहिलेले असावे, संशोधनात्मक शोधनिबंध मराठी, इंग्रजी भाषेत असावेत, २५00 पर्यंत शब्द असावे, सारांश शब्दमर्यादा २00 असावी, असे शोधनिबंध रिसर्च बुलेटिनसाठी पाठविण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. शोधनिबंधांचे लेखन करून राज्य स्तरावर सादर करण्याचे निकष व माहितीसुद्धा देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षकांनी शोधनिबंध संशोधन विभागाकडे १0 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.