अकोला, दि. ९- मोठी उमरी परिसरातील रहिवासी असलेली एक युवती जठारपेठेतून दुचाकीने घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी सदर युवतीस मारहाण करीत तिची बॅग आणि मोबाइल पळविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.मोठी उमरी येथील रहिवासी बनसोड नामक युवती तिच्या दुचाकीने जठारपेठेतून मोठी उमरीत जात असताना राऊतवाडीत आल्यानंतर दोन युवकांनी या युवतीला रोखले, त्यानंतर सदर युवतीच्या दुचाकीवरील बॅग घेतली, तिने विरोध करताच दोन्ही युवकांनी तिला मारहाण करीत मोबाइलही हिसकला, हा प्रकार पाहत असलेले काही नागरिक युवतीजवळ येईपर्यंत दोन्ही युवक बॅग आणि मोबाइल घेऊन दुचाकीने पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी काही वेळताच युवती सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिने पोलिसात तक्रारही केली; मात्र पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान अलीकडच्या काही दिवसात शहरात राज रोजपणे लुटमारीचे प्रकार घडत असून पोलीस प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.
युवतीस मारहाण करून बॅग पळविली
By admin | Published: October 10, 2016 3:13 AM