- अतुल जयस्वालअकोला : रक्तदानाबाबत अजूनही पुरेशी जागृती नसल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.रक्ताला पर्याय नसल्यामुळे मनुष्याला लागणाऱ्या रक्ताची पूर्तता केवळ मानवी रक्तानेच होऊ शकते. शस्त्रक्रिया, अपघात, सिझेरियन, थॅलेसिमिया, सिकलसेल आदी आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज भासते. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. एखाद्याला गरज भासली, तर ‘डोनर’शिवाय पर्याय नसतो. अनेकदा रक्त नसल्यामुळे रुग्णाला प्राणही गमवावा लागतो. या सर्वांवर मात करण्यासाठी अकोल्यातील काही तरुणांनी समोर येऊन १३ आॅगस्ट २०१६ रोजी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप स्थापन केला. बघता-बघता या ग्रुपसोबत १२०० रक्तदाते जुळले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा शहरातील कोणत्याही खासगी इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास या ग्रुपमधील सदस्य मदतीसाठी धावून येतात. ग्रुपच्या सदस्यांकडून रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जाते.