अकोला, दि. १९- जुने शहरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख लंपास करणार्या दोघा अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. जुने शहरात राहणार्या शोभा बोदडे यांच्या घरी ३१ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पाच ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार रुपयांची रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी एएसआय अशोक चाटी, संदीप काटकर, अमित दुबे, रवी इरचे यांनी तपास करून हरिहरपेठ येथे राहणार्या दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हय़ाची कबुली आणि लंपास केलेले रोख १0 हजार रुपयांची रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली. सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात पोलिसांनी दोघाही मुलांना विचारणा केली असता, त्यांनी सोन्याचे दागिने एका नालीत फेकून दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी नालीत फेकलेल्या दागिन्यांचा शोध घेतला; परंतु दागिने मिळाले नाहीत. दोघाही मुलांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना अटक
By admin | Published: January 20, 2017 2:41 AM