अकोला : मुंबई परिसरातील ओरीवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३६ लाख ५० हजारांची रोकड चोरी करून फरार झालेल्या चोरट्याने अकोल्यातील न्यू तापडिया नगरात आश्रय घेतला. अनेक दिवसांपासून तो याठिकाणी दडून बसला होता आणि चोरीच्या रकमेवर मौजमस्ती करीत होता. मुंबई या चाेरट्यास अकोला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दुपारी अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्याकडून ३६ लाख ५० हजार रूपयांची रोकड हस्तगत केली.
मुंबईतील ओसीवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांच्या चोरीची घटना घडली होती. त्यातील आरोपी संतोष चव्हाण हा ३६ लाखांची रक्कम घेवून फरार झाला होता. तो अकोला शहरात दडून बसल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना शोध घेण्याचे आदेश दिले. १३ ऑक्टोबर रोजी एलसीबी प्रमुख शंकर शेळके व सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत हे रामदासपेठ पोलिस ठाण्यातर्गंत एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांनी, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी न्यू तापडिया नगरातील क्रांती चौकात असल्याची माहिती मिळाली. याठिकाणाहून एलसीबी पथकाने आरोपी संतोष सुदामा चव्हाण (रा.तेजश्री अपार्टमेंट रुम नं. १०६ घनसोळी नवी मुंबई) याला अटक केली. ही कारवाई १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले असून, त्याकडून चोरीतील रक्कम पैकी ३६ लाख ५० हजार रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. आरोपीस संतोष चव्हाण याला रोख रकमेसह ओसीवारा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
रोकड घेऊन पोहोचला अकोल्यातमुंबईत कोट्यावधी रूपयांची चोरी केल्यानंतर आरोपी संतोष चव्हाण हा सुमारे ३६ लाख रूपयांची रोकड घेऊन रेल्वेने अकोल्यात आला. त्याने न्यू तापडिया नगरातील भागात आपले बस्तान बसविले. कोणाच्या नजरेत येऊ नये. याची खबरदारी तो घ्यायचा. त्याला अटक केल्याची कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी रवी खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकुल चव्हाण, खुशाल नेमाडे, एजाज अहमद, विशाल मोरे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, अक्षय बोबडे, अमोल दिपके, राज चंदेल, नदीम शेख, सायबर सेलचे आशिष आमले यांनी केली.