लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कारमधून आलेल्या चोरट्यांनी गीता नगरातील अंजली पार्क अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात १२.३0 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गीता नगरात राहणारे संजय रामनारायण गुप्ता (४८) यांच्या तक्रारीनुसार अंजली पार्कमध्ये त्यांचे दुसऱ्या मजल्यावर घर आहे. त्यांची पत्नी व मुलगा पुणे येथे मोठ्या भावाकडे गेले आहेत. त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने, संजय गुप्तासुद्धा गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास लक्झरी बसने पुण्याला जाण्यासाठी निघाले; परंतु दरम्यान त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पाटील नामक शेजाऱ्याने, त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडल्याची माहिती गुप्ता यांना दिली. गुप्ता तसेच बसमधून उतरून घरी परतले. त्यांना फ्लॅटचा दरवाजाची चौकट तोडलेली दिसून आल्यावर जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. कारमधून आलेल्या चोरट्यांनी घरात प्रवेश करून शयनकक्षातील लाकडी कपाट तोडून त्यातील रोख आठ हजार रुपये आणि किरकोळ सोने, चांदीचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकर न तुटल्यामुळे त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने शाबूत राहिले. संजय गुप्ता यांची पत्नी पुण्याला असल्याने, नेमके किती ग्रॅम सोन्याचे दागिने गेले, याची निश्चित माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. सीसी कॅमेरे तपासणार अंजली पार्कसह परिसरातील काही इमारतींमधील सीसी कॅमेऱ्यांमधील चित्रण पोलीस तपासणार आहे. अंजली पार्कमधील गुप्ता यांचे शेजारी पाटील यांनी तिघा जणांना कारमध्ये येताना पाहिले. हे तिघे जण कारमधून उतरून अपार्टमेंटमध्ये घुसले. ते कोणाच्या घरातील पाहुणे असतील म्हणून पाटील यांनी दुर्लक्ष केले; परंतु काही तासानंतर गुप्ता यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडल्याचे त्यांना दिसून आले.
कारमधून आलेल्या चोरट्यांनी घर फोडले
By admin | Published: June 02, 2017 1:38 AM