अकोला : हिंगणा शेतशिवारात घडलेल्या बन्सीप्रसाद ठाकूर हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी आणखी एका आरोपीस अटक केली. पोलिसांनी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली असून, आता आरोपींची संख्या तीन झाली आहे. या तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोघांची कारागृहात रवानगी केली असून, तिसऱ्या आरोपीस १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.हिंगणा शेतशिवारात ९ डिसेंबर २०१६ रोजी बन्सीप्रसाद ठाकूर यांची धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हत्याकांडानंतर जुने शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. २० महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर बन्सी ठाकूर यांचे मारेकरी हिंगणा येथील रहिवासी अतुल ऊर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर व कापशी रोड येथील रहिवासी बंटी रामकरण केवट या दोघांना अटक केली. त्यांच्या कसून चौकशीत आणखी तीन नावे समोर आली असून, यामधील विशाल राजू राजपाल या तिसºया आरोपीस सोमवारी अटक केली. यामधील आणखी दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आधीच अटकेत असलेल्या दोन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तर विशाल राजपाल याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.