रवि दामोदर
अकोला : फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये अकोला जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ६६.३८ टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्ह्याचा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
मुलांच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र शासनाने ‘फीट इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सृदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळा स्तरावर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापनविषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपद्वारे भरण्यात यावी आदी उद्देश यशस्वी व्हावे याकरिता फीट इंडिया मोहिमेंतर्गत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, राज्यातून जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८६४ पैकी १२४३ शाळांची नोंदणी झाली असून, उर्वरित शाळांच्या नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शाळेत विविध खेळ, स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १७६७ पैकी १६११ अशा ९१.१७ टक्के शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फीट इंडिया मोहिमेंतर्गत १,०९,९०८ पैकी ५०,८३८ शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
--------------------------------------------------
टॉप-५ जिल्हे
जिल्हा एकूण शाळा नोंदणी झालेल्या शाळा टक्केवारी
मुंबई १७६७ १६११ ९१.१७ टक्के
वर्धा १५१२ १०७४ ७१.०३ टक्के
अकोला १८६४ १२४३ ६६.३८ टक्के
सिंधुदुर्ग १७३७ ११४५ ६५.९२ टक्के
यवतमाळ ३३४७ २१०० ६२.७४ टक्के
-----------------------------------------------
जिल्ह्यात फीट इंडिया मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातून प्रथम क्रमांकावर येण्यासाठी उर्वरित शाळांनी नोंदणी पूर्ण करावी.
-दिनकर उजळे, क्रीडा अधिकारी, अकोला