नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणार्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे. त्यांचे कोणत्या विषयामध्ये किती ज्ञान आहे. हे तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने अकोला जिल्हय़ातील १७३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले. इयत्ता तिसरी व पाचवीच्या प्रत्येकी ६१ आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणार्या विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (इव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास, मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. यात इयत्ता तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कौतुकास्पद नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून आले. परंतु जिल्हय़ातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत बरेच माघारले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आठवीत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे या सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या टक्केवारीतून दिसून येत आहे.
केंद्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्या प्राधिकरणांतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हय़ातील १७३ शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण घेतले. या सर्वेक्षणात तिसरी, पाचवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक आहे. आठवीतील विद्यार्थ्यांंची गुणवत्ता खालावलेली असून, ही गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - सागर तुपे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण