- संजय खांडेकरअकोला : अकोला शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील गोरगरिबांना स्वस्त दरात हातोहात कपडे शिवून देणारी यंत्रणा गेल्या ७५ वर्षांपासून सावतराम मिल्सच्या टेलर चाळीत अविरत सेवा देत आहेत. या सेवेचा वारसा तिसऱ्या पिढीने कायम ठेवला असला तरी अद्याप येथील समस्या सोडविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सावतराम टेलर चाळीची तिसरी पिढीदेखील वंचिताचे जिणे जगत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाच्या भिंतीलगत सावतराम टेलर चाळ वसलेली आहे. जुन्या कापड बाजारात येणाºया ग्राहकांचे कपडे तातडीने शिवून देणाºया या चाळीला आता ७५ वर्षांचा कालावधी झाला. ही चाळ अजूनही त्याच अवस्थेत ऊन-पाऊस झेलत तटस्थ उभी आहे. वडिलांचा व्यावसायिक वारसा मुलांकडे आपसूकच आल्याने आता तिसरी पिढी येथे कार्यरत आहे. तब्बल चाळीस टेलर एका ओळीने येथे शिवणकाम करीत असतात. गोरगरिबांना हातोहात माप घेऊन कपडे शिवून देणाºया या चाळीत आता नवीन पिढी येत नसली तरी जुने जाणते येथे आजही त्याच विश्वासाने येतात. पट्ट्याची हाफ पॅन्ट, बंडी, पायजामा, सदरा, पॅन्ट, अल्टर करून देणाºया या चाळीतील सर्व टेलर्सचे कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. दिवसभर शिवणकाम करणारे टेलर रात्री जाताना आपल्या शिवण मशीन येथील मजबूत कुलूपबंद पेटीत ठेवून देतात. शिवणयंत्राचे पायडल मात्र त्याच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठेवून असते. आजपर्यंत येथे कधी चोरीची घटना घडली नाही. तीन पिढ्यांपासून सावतराम चाळीत सेवा देणारे टेलर यांना साधे ओटेदेखील बांधून देण्याची तसदी महापालिकेने घेतली नाही. लोकप्रतिनिधींनीदेखील कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे ही चाळ अजूनही उपेक्षितांचे जिणे जगत आहे. लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी आम्हाला अनेकदा सुविधा देण्याचे आश्वासन दिले; मात्र कुणीही शब्द पाळला नाही. महापालिकेचा कर आम्ही नियमित भरत असल्याने आम्हाला ही जागा उपलब्ध झाली आहे. मनपाने आम्हाला ओटे बांधून द्यावे.-वासुदेव श्रीराम शिंदे, टेलर, सावतराम चाळ, अकोला.