या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमना पाेलीस ठाण्याच्या हद्दीत तृतीयपंथी कैदी उत्तम उर्फ बबा सपन सेनापती याने एकाची हत्या केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७, ३४१, ३२३, १४७, १४८, १४९ व मुंबइ पाेलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे़ कळमना पाेलिसांनी या आराेपीला नागपूर येथील न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीची कारागृहात रवानगी केली हाेती. विचाराधीन कैदी असलेल्या उत्तम सेनापती यास सुरक्षेच्या कारणावरून १७ जून २०२१ राेजी अकाेला येथील कारागृहात हस्तांतरित करण्यात आले हाेते. अकाेला जिल्हा कारागृह प्रशासनाने या आराेपीस महिलांसाठी राखीव असलेल्या मात्र रिकामी असलेल्या एका वेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे. २० सप्टेंबर राेजी या तृतीयपंथी आराेपीने त्याची मुलगी तमन्ना हिच्यासाेबत फाेनवरून बाेलणे केले़ त्यानंतर कारागृहातील महिला कर्मचारी रजिस्टरवर नाेंद करीत असता उत्तम सेनापती याने बरॅककडे धाव घेत त्या ठिकाणी असलेले सॅनिटायझर पिण्यासाठी बाटली घेतली़ तेवढ्यात महिला कर्मचाऱ्यांनीही तातडीने धाव घेऊन सेनापतीकडे असलेली बाटली हिसकावली. त्यानंतर या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाला दिली़ यावरून कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तम सेनापती याला तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धाेक्याबाहेर आहे. या प्रकरणाची तक्रार कारागृहातील महिला कर्मचारी प्रजापती प्रभाकर सावदेकर यांनी सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात दिल्यानंतर पाेलिसांनी विचाराधीन तृतीयपंथी कैद्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़
आत्महत्येचा दुसऱ्यांदा केला प्रयत्न
तृतीयपंथी कैदी उत्तम सेनापती यास अकाेला कारागृहात आणल्यानंतर काही दिवसांतच अंगावर घेण्यासाठी दिलेली चादर फाडून त्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. या प्रकरणाची तक्रार त्या वेळी सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात देण्यात आली हाेती. आता दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न या विचाराधीन कैद्याने केला़
महिला कर्मचाऱ्यांची सतर्कता
उत्तम सेनापती या तृतीयपंथी कैद्याने मुलीसाेबत बाेलणे झाल्यानंतर धाव घेत सॅनिटायझर पिण्यासाठी बाटली घेताच कारागृहातील कर्मचारी प्रजापती सावदेकर व शालिनी भानसे या दाेन महिला कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून तृतीयपंथीच्या हातातील बाटली हिसकावली. तसेच त्याला शांत करीत रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला़