अकोला: महापालिका हद्दवाढ भागातील शंभर कोटींच्या प्रस्तावित कामांचे आॅडिट आता थर्ड पार्टी होणार आहे. थर्ड पार्टी आॅडिटची जबाबदारी अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ चमूला देण्यात आली आहे. अमरावतीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांसोबत शनिवारी अकोल्यातील अभियंता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी या टीमला सहाशे ईस्टीमेट सोपविण्यात आलेत.कोट्यवधीची विकास कामे होत असताना कामांचा दर्जा टिकावा, तांत्रिकदृष्ट्या ते काम योग्य पद्धतीने व्हावे म्हणून शासनाने आता, प्रत्येक कामांचे थर्ड पार्टी आॅडिट सुरू केले आहे. अकोला महापालिकेच्या हद्दीबाहेर शंभर कोटींची विकास कामे प्रस्तावित आहे. त्यात रस्ते, पाणी पुरवठा पाइपलाइन, पथदिवे, नाल्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे. ही विकास कामे योग्य पद्धतीने करण्यासाठी अंदाजपत्रकांपासून तर गुणवत्ता तपासणीपर्यंतचे काम थर्ड पार्टी करणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व विकास कामांचे ईस्टीमेट द्यावे लागते. अमरावती येथील शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांची तज्ज्ञ चमू शनिवारी अकोल्यात येऊन गेली. प्राध्यापक लांडे आणि ठाकरे यांच्या नेतृत्वात आलेल्या तज्ज्ञांनी अकोल्यातील सहाशे ईस्टीमेटची माहिती पदाधिकारी आणि अभियंताकडून घेतली. थर्ड पार्टी आॅडिट करणारी ही चमू आता शहरात प्रत्यक्ष फिरून घटनास्थळावर जाऊन विकास कामांचा आढावा घेणार आहे. शनिवारी महापालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत तज्ज्ञ अभियंतासोबत महापौर विजय अग्रवाल, सुरेश हुंगे, वाकोडे आदी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.