अकोला : तंबाखू सेवन हे जगातील अनेक आजार आणि मृत्यूचे मोठे कारण आहे. जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो. हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.भारतात सध्या सुमारे २५ लाख कर्करुग्ण आहेत. त्यात दरवर्षी ७ लाख लोकांची भर पडते. पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील कर्करोग हे भिन्न स्वरूपाचे आहेत. पुरुषांची जीवनशैलीच मुळात घातक आहे. एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी आहे. धूम्रपानामुळे कर्करोग झालेले जगभरात आहेत. भारतात मात्र बिडी ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खैनी आणि त्यासोबत चुना (घोटा) याची गोळी गाल आणि जबड्याच्या मध्ये किंवा जिभेखाली ठेवली जाते. त्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो.धूम्रपान हे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारणयंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत असणाºया दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते, असे जर्नल आॅफ अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजीच्या सप्टेंबर २००९ च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.नियंत्रणासाठी ‘कोटपा अॅक्ट’तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी ‘कोटपा अॅक्ट’ (तंबाखू नियंत्रण कायदा) २००३ तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करतो. यामध्ये १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही. शाळेपासून १०० मीटरच्या परिसरात पानटपरीला परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, अशी काही बंधने आहेत.तंबाखूयुक्त पदार्थाचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा घातक पदार्थांचे सेवन न करणे कधीही चांगले. यासाठी तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव जनतेला करून देणे गरजेचे आहे.-डॉ. राजेश रांदड, मुुख कर्करोग तज्ज्ञ, अकोला.व्यसने ही कायद्याच्या धाकाने सुटणे कठीण आहेत. त्यासाठी योग्य समुपदेशन आणि सकारात्मक कृतीची गरज आहे. त्या अनुषंगाने व्यसनाधीन माणसांची व्यसन सोडण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीद्वारे तशी कृती होताना दिसत असेल तरच ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ साजरा झाला, असे म्हणता येईल.डॉ. प्रीती कोगदे (कवळकर), जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,अकोला.