अकोला: आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यावर केवळ ९० रुपये पीक विमा भरपाई रक्कम जमा केली आहे.
यंदा अतिवृष्टी व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत मिळाली; मात्र ती रक्कम अतिशय कमी शेतकरी संकटात सापडला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणे अपेक्षित होते; मात्र शेतकऱ्यांना त्यासाठी निवेदन देऊन, आंदोलन करून मागणी करावी लागली. त्याचा उपयोगही झाला, मात्र पीक विम्यापोटी मिळणारी भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे.
पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. मला पीक विम्याच्या भरपाईपोटी केवळ ९० रुपये प्राप्त झाले. उलट मी पीक विम्यापोटी कंपनीकडे ८४४ रुपयांचा भरणा केला आहे. जेवढ्या रकमेचा भरणा केला, तेवढीही रक्कम मिळाली नाही. मी ही मदत कंपनीला परत करणार आहे. - प्रभाकर घोगरे, शेतकरी