अकोला: जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा तसेच फाटले आभाळ ज्यांचे, हो तयाचा सोबती या संतांच्या उक्ती प्रमाणे विविध सामाजिक कार्यांंमध्ये अग्रेसर असलेल्या शिवाजी महाविद्यालयात व्हॅलेंटाइन डे हा प्रेमाचा दिवस रविवारी आगळय़ा-वेगळय़ा पद्धतीने साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या संकल्पनेतून हा दिवस महाविद्यालयात साफसफाईचे काम करणार्या कष्टकरी, गरजू महिलांना साडी-चोळी देऊन साजरा करण्यात आला. स्थानिक शिवाजी महाविद्यालयात नेहमीच परिवर्तनवादी व विज्ञानवादी विचारांची कास धरून विविध उपक्रम राबविले जातात. या महाविद्यालयात विविध उत्सवांना समाजाभिमुख बनवून त्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने करतात. या सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून रविवार, १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे वेगळय़ा पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हॅलेंटाइन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रेम द्यावे - प्रेम घ्यावे या उक्तीप्रमाणे महाविद्यालयात साफसफाईचे काम करणार्या महिलांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला. रविवारी, सकाळी या महिलांना महाविद्यालयाच्यावतीने साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रेमाच्या भेटीने या कष्टकरी महिलांच्या डोळय़ांत तरळलेल्या आनंदाश्रूंमध्ये महाविद्यालयाप्रति कृतज्ञतेची झलक दिसत होती. कष्टकरी महिलांना दिलेली ही प्रेमाची भेट सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे उद्गार प्राचार्य डॉ. भडांगे यांनी काढले. याप्रसंगी डॉ. आशिष राऊत, प्रा. राहुल माहुरे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
फाटले आभाळ ज्यांचे, हो तयाचा सोबती!
By admin | Published: February 15, 2016 2:34 AM