अकोला: जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, दगडपारवा धरणातील मृतसाठय़ावर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांची तहान भागविली जात आहे. सध्या या गावांना पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत, या धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी या धरणातून उन्नई बंधार्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. महान धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गेल्या १ नोव्हेंबरपासून दगडपारवा धरणातील मृतसाठय़ातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
‘दगडपारवा’तील मृतसाठय़ावर ६४ गावांची तहान!
By admin | Published: November 09, 2014 12:33 AM