नितीन गव्हाळे - अकोलामानवाकडून विकासाच्या नावाखाली होत असलेली बेसुमार वृक्षतोड. कमी होत असलेले वनक्षेत्र तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई, यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जात असताना मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. २0१६-१७ वर्षांमध्ये ३ हजार २५८ शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले असून, त्याची नुकसानभरपाई म्हणून वन विभागातर्फे १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे.वन्य प्राण्यांमुळे शेतातील पीक किंवा फळबागांचे नुकसान झाल्यास उत्पादकाला वन विभागाकडून दुपटीने नुकसानभरपाईची रक्कम दिली जाते. पिकांच्या नुकसानापोटी दहा हजारांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच दहा हजारांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्यास ८0 टक्के रक्कम देय असून, त्याची कमाल मर्यादा २५ हजार इतकी करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी ९४८.५५ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान केले. या नुकसानापोटी ३२५८ शेतकऱ्यांना ७२ लाख ९७ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. मानवी वस्तीवर हल्ले वाढले! जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्या, माकड यासह वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यातून शेळी व मेंढ्यांसह गुरे व ढोरांवर तसेच मानवावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरी वस्तीत माकडांचादेखील मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यानंतर वन विभागातर्फे हल्ला झालेल्या व्यक्तीला भरपाई देण्यात येत असते. त्यानुसार वनरक्षक, कृषी अधिकारी व सरपंच हे संयुक्तपणे पंचनामा करीत असतात. पंचनामा विभाग स्तरावर पाठविण्यात येतो. आॅनलाइन फिडिंग झाल्यानंतर त्यावर उपविभागात मंजुरी मिळाल्यानंतर नुकसानभरपाई देण्यात येते.शेतीक्षेत्राचे सर्वाधिक नुकसान जंगलात पिण्यासाठी पाणी व अन्न नसल्याने हरीण, नीलगायी तसेच रानडुक्कर हे शेती क्षेत्राकडे धाव घेत आहेत. जिल्ह्यात कपाशी व केळीचे क्षेत्र जास्त आहे. त्यापाठोपाठ, कडधान्य, ऊस, भुईमुगाची शेती करण्यात येत असते. नीलगायी तसेच रानडुक्कर यांच्याकडून कपाशी व भुईमुगाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. जंगलक्षेत्राच्या जवळ असलेल्या शेतातील पिकांचे संपूर्ण क्षेत्र वन्य प्राण्यांकडून नष्ट केले जात आहेत.वन्य प्राण्यांनी शेतीपिकांचे नुकसान केल्याच्या, हल्ला केल्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. उपवनसंरक्षक प्र.ज. लोणकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून यंदा तीन हजारांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. - गोविंद पांडे, वन्य जीव शाखाप्रमुख, वन विभाग