अकोला: श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून जलाभिषेक करण्याची अकोलेकरांची गत ७० वर्षांपासूनची परंपरा आहे. यासाठी रविवारी अकोल्यातील शेकडो शिवभक्त कावड घेऊन गांधीग्रामकडे रवाना झाले. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा आहे. शहरातील शिवभक्त मंडळाच्या कार्यकर्ते महिनाभरापासून कावड यात्रेची तयारी करतात. ठरलेल्या संख्येप्रमाणे भरण्यांची कावड बांधून त्यावर आकर्षक संदेश देणारा सामाजिक, धार्मिक देखावा देखिल साकारतात. रविवारी शिवभक्त मंडळाच्या कावडधारी हजारो युवक पुर्णा नदीचे जल आणण्यासाठी वाहनांनी रवाना झाली. उशिरा रात्री शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावर कावड घेऊन १८ किमी पायी चालत पहाटे अकोल्यात पोहोचतील आणि मिरवणुक काढून एक-एक मंडळाच्यावतीने राजराजेश्वराला जलाभिषेक करतील.
बाभळेश्वर, डाबकी रोडवासी, श्रीराम सेनेची कावड आकर्षण! यंदाच्या कावड यात्रेमध्ये बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, डाबकी रोडवासी मित्र मंडळ, श्रीराम सेना यांची कावड विशेष आकर्षण राहणार आहे. तसेच हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १0१ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण राहणार आहे. कावडसोबतच शिवभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले आहेत.