- विजय शिंदे
अकोटःअकोट तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीमधील अंकुरलेली पिके पाण्याखाली बुडाली आहेत.रविवारी रात्रीपासूनच अखंड पाऊस सुरु आहे. शेतीचे तलावात रुपांतर झाले असुन पाऊस सुरुच आहे. शेतकऱ्यांचे लाखोरुपयाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
अकोट तालुक्यात अल्प/अत्यपभुधारक शेतकरी ४९,३५३ तर बहु भूधारक शेतकरी ६,७३२ आहेत. तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ७१,५०० आहे. त्यामध्ये कापूस- ४१,४८१,सोयाबीन-१२,७२०,तुर-६०००,मुंग-३,९९०,उडीद-२०२०,ज्वारी-९५० पेरा झाला आहे. मात्र पेरणी झाल्यानंतर काही भागातील पिके निदंन व डवरणीवर आली होती. पंरतु अखंड पाऊस सुरु असल्याने हजारो हेक्टर शेतात पाण्याचे तलाव झाले आहे. सर्वदूर नजर जाईपर्यंत शेतात समुद्र झाल्यागत परिस्थिती आहे.
खारपाणपट्यात शेती निसर्गाच्या पाण्यावर विसंबून आहे. पंरतु भागात आता दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याची स्थिती आहे. नदी-नाले दुधळी वाहत आहे. काही शेतात नाल्यामधुन पाणी शिरले.भरपावसात अकोट तालुक्यातील केळीवेळी, गिरजापुर, धारेल परिसरात बुडालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार निलेश मडके हे मंडळ अधिकारी सह तलाठी घेऊन दौऱ्यावर आहेत. पाऊस सुरुच असल्याने पाणी साचलेल्या शेतातील पिकासह जमीन खरडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे.