अकोला: पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात १,०८० खाटा असून, हजारावर रुग्ण दाखल होत असले, तरी या रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कक्ष सेवकांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंतची केवळ ७७३ पदेच मंजूर असून, त्यापैकी अनेक पदे रिक्त असल्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे.अकोला हे राष्ट्रीय महामार्गावरील तसेच मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन असलेले शहर असून, वैद्यकीय क्षेत्रात अकोल्याचे स्थान बरेच वरचे आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या बुलडाणा, वाशिम, हिंगोली व अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णालयाची रोजची बाह्यरुग्ण संख्या २,००० असून, आंतररुग्ण संख्या १,००० ते १,२०० च्या घरात आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार येथे २,२३६ पदे असावयास हवीत; परंतु आज रोजी येथे केवळ ७७३ पदे मंजूर आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक, अतांत्रिक, परिचारिका, सफाई कामगार आदींचा समावेश आहे. यापैकी अनेक पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवा बाधित होत आहे. त्यातही अर्धेअधिक कर्मचारी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सुटीवर, वैद्यकीय रजेवर राहतात. अधिपरिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देताना, प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. वार्डबॉय, नर्स, सफाई कामगार व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने रुग्णांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.रुग्णांचा भार नातेवाइकांच्या खांद्यावररुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांना अपघात कक्षातून किंवा वार्डमधून एक्सरे, सीटी स्कॅन करण्यासाठी हलवायचे असल्यास वॉर्डबॉय किंवा इतर कर्मचाऱ्यांनी मदत करणे अपेक्षित आहे; परंतु येथे रुग्णांना हलविण्याचे काम नातेवाइकांनाच करावे लागते. एवढेच नव्हे, तर कधी-कधी स्ट्रेचरही उपलब्ध नसते. नातेवाइकांना रुग्णांना आधार देऊन किंवा उचलून न्यावे लागते. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग ओढवतात; परंतु महाविद्यालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.एमसीआयच्या नियमांना ठेंगा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असल्यामुळे सर्वोपचारला एमसीआयचे नियम लागू होतात; परंतु राज्य शासनाने एमसीआयच्या नियमांना ठेंगा दाखविला आहे. सर्वोपचारमधील रिक्त जागा भरण्यासाठी राज्यशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
रुग्ण हजारांवर; डॉक्टर, कर्मचारी मात्र ७७३
By admin | Published: May 02, 2017 1:17 AM