लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवैध संपत्ती आणि मालमत्ता गोळा करण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडीची कारवाई केलेल्या अकोल्याच्या गीता नगर भागातील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च, अकोला या संस्थेच्या संचालिका मीना माहुरे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीचे मूळ कागदपत्रे तिला परत देण्यासाठी मीना माहुरे यांनी सदर विद्यार्थिनीकडे ५५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार या विद्यार्थिनीने सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबतच जुने शहर पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही दिली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील गोरव्हा या गावात राहणारी अश्विनी सुनील डोंगरे ही विद्यार्थिनी सन २0१३-१४ ते सन २0१५-१६ या कालावधीमध्ये गीता नगर भागातील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च, अकोला या संस्थेत आरजीएनएमचे प्रशिक्षण घेत होती. जानेवारी २0१७ मध्ये तिने हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्णही केला. या संस्थेद्वारे विविध कारणाने आकारली जाणारी सर्व ‘फी’देखील तिने अदा केली आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर सदर विद्यार्थिनीने संचालिका मीना माहुरे यांच्याकडे संस्थेत प्रवेश घेतेवेळी सादर करण्यात आलेली सर्व शैक्षणिक मूळ कागदपत्रे परत देण्याची विनंती केली असता, मीना माहुरे यांनी तिच्याकडे ही कागदपत्रे परत देण्यासाठी ५५, 000 रुपयांची मागणी केली. सदर विद्यार्थिनी ही गरीब कुटुंबातील असून, तिचे वडील शेतात मजुरी काम करतात. एवढी मोठी रक्कम कशासाठी मागितली जात आहे, अशी विचारणा केली असता मीना माहुरे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिले, तसेच मी पोलिसांना खरेदी केले आहे, कोणी माझे काहीच वाकडे करू शकत नाही, अशी उर्मट भाषा वापरल्याचा आरोप सदर विद्यार्थिनीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
आमरण उपोषणाचा इशारानर्सिंगचा कोर्स पूर्ण करूनही गेल्या आठ महिन्यांपासून मूळ कागदपत्रांअभावी नोकरीपासून वंचित असल्याने मी हताश आणि निराश झाले असून, मला न्याय न मिळाल्यास मी आमरण उपोषण करून माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन, त्यासाठी सर्वस्वी मीना माहुरेच जबाबदार राहतील, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.