अकोला: माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंगांनी १९९० मध्ये आरक्षणाची शिडी तयार केली. या शिडीमुळे समाजातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर होताहेत. नोकऱ्यांवर लागताहेत. आरक्षणाची शिडी नसती तर कोणी पुढेच गेले नसते. तुमच्या मुलांचे आयुष्य, सुखरूप, सुरक्षित करायचे असेल आरक्षण वाचवलं पाहिजे. येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धाेका आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले पाहीजे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने रविवार १८ ऑगस्ट रोजी जि.प. कर्मचारी भवन येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पातोंड गुरूजी होते. विशेष सत्कारमूर्ती म्हणून नवनियुक्त आयएएस अधिकारी श्रीकृष्ण सुशीर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर सुमनताई गावंडे, जि.प. सभापती योगिता रोकडे, जि.प. सदस्य प्रमोदिनी कोल्हे, मिना होपळ, माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे, जि.प. माजी सभापती बळीराम चिकटे, काशिराम साबळे, गोपाल कोल्हे, माजी पोलिस उपअधीक्षक केशवराव पातोंड, जिल्हा कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने, श्रीराम गावंडे, आदी उपस्थित होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व हारार्पण केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएसआय गजानन गावंडे यांनी तर संचालन राजश्री काळंके यांनी केले.