लोहगड: ग्रामीण भागातील अनेक गावांत चोरटे सक्रि य असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याने बाश्रीटाकळी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांची टोळीच फिरत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेमुळे महिला वर्गांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच दगडपारवा, पुनोती, तिवसा आदी गावांत चोरांची टोळी आल्याची वार्ता पसरली होती. यामुळे संपूर्ण बाश्रीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झाले. गत दोन दिवसांपूर्वी लोहगड येथेही चोरांची टोळी दाखल झाल्याच्या अफवेने ग्रामस्थ घाबरून गेले होते. चोरांच्या भीतीपोटी ग्रामस्थ रात्रभर जागरण करीत आहेत. उल्लेखनीय बाब अशी, की तालुक्यातील ग्रामीण भागात चोरटे सक्रिय असल्याच्या वार्ता कानावर येत असल्या तरी, कोण्याही ठिकाणी लुटमार, दरोडा, चोरी झाल्याची एकही तक्रार तालुक्यातील एकाही पोलिस स्टेशनला दाखल झालेली नाही. त्यावरून तालुक्यात चोरांची टोळी सक्रिय असल्याची वार्ता ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होत आहे. ही अफवा असली तरी, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाही पोलिस प्रशासन मात्र त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)
चोरांच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण
By admin | Published: July 03, 2014 10:45 PM