अकोला : पोलिसांच्या खबर्या असल्याच्या संशयावरून हमजा प्लॉटमध्ये झालेल्या शेख आकीब खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २७ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुन प्रकरणातील चार आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.वाशिम बायपास रोडवरील हमजा प्लॉटमध्ये नवाबपुरा येथील रहिवासी शेख आकीब शेख आरीफ याच्यावर सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकीबला सवरेपचार रुग्णालयात नेण्यात येत असतानाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फिरोज, शेख हसन आणि शेख रियाज यांचा समावेश आहे. जुने शहर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर मंगळवारी रात्री यामधील मुख्य आरोपी शेख कासम शेख जी, शेख मजीद शेख इब्राहीम व शेख हसन शेख इब्राहीम या तीन आरोपींला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना २७ जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांना शरण येत असलेला आरोपी घाबरलाशेख आकीब याच्या खुनानंतर सातमधील एक आरोपी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना शरण येण्यासाठी आला होता. मात्र आकिबच्या नातेवाईकांचा संताप बघीतल्यानंतर सदर आरोपी घाबरला व त्याने पलायण केले.