वाशिम : विदर्भ - मराठवाड्यात चर्चेत असलेल्या डोईफोडे खून प्रकरणातील पसार असलेल्या चार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात १ जून रोजी हिंगोली पोलिसांना यश आले आहे. यामधील महिला पोलीस शिपाई अद्यापही पसारच आहे. अकोला येथील रवी डोईफोडे खूनप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेली मुख्य सूत्रधार उषा मुंढे हिने डोईफोडे हत्याकांड प्रकरणात चौघांची मदत घेतल्याची कबुली दिली होती. यामध्ये वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला पोलीस शिपाई दिलीप लेकुळे व त्याची पोलीस शिपाई पत्नी सविता चव्हाण, हिंगोली जिल्ह्यातील बासंबा येथील राजेश बाजीराव ढाले व आनंद नगर हिंगोली येथील शिवाजी केशव तराळ यांचा समावेश आहे. हे चारही आरोपी पसार झाले होते. या आरोपींचा शोध घेण्यासाठी हिंगोली पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती. पसार झालेल्या आरोपींपैकी वाशिम येथील पोलीस शिपाई दिलीप लेकुळे, राजेश ढाले व शिवाजी तराळ यांना अटक करण्यात हिंगोली पोलिसांना यश आले. या चारही आरोपींना हिंगोली पोलीस २ जून रोजी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तत्पूर्वी डोईफोडेचा खून कशाप्रकारे केला, याचा तपास करण्यासाठी सर्व आरोपींना वाशिम येथे पडताळणी करण्यासाठी आणण्याची शक्यता आहे. सद्य परिस्थितीमध्ये पसार असलेली महिला पोलीस शिपाई सविता चव्हाण हिचा शोध घेण्यासाठी पोलीस विदर्भ व मराठवाड्यातील शहरे पिंजून काढत आहेत. खून प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रकरण आणखी काय वळण घेते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
पोलीस शिपायासह तीन आरोपी अटकेत
By admin | Published: June 02, 2015 2:12 AM