मूर्तिजापूर (जि. अकाेला) : तालुक्यातील माना येथे ३१ मार्चला खोदकामात दगडाच्या तीन प्राचीन मूर्ती आढळून आल्या आहेत. अकोला, अमरावती येथील अभ्यासकांनी या मूर्तींची पाहणी करून या जैन मूर्ती असल्याचे सांगितले. यावेळी मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. माना येथील रमेश इंगोले यांच्या आजोबांनी त्यांना घराच्या खाली मूर्ती असल्याचे सांगितले होते. इंगोले यांच्या मित्रपरिवारातून ही माहिती सर्वत्र पसरली.
१९८६मध्येही सापडल्या होत्या जैन मूर्ती
यापूर्वी १४ मार्च १९८६ रोजी माना येथे याच जागेवर खोदकाम करताना जैन मूर्ती आढळून आल्या होत्या. या मूर्ती आजही नागपूर येथील म्युझियममध्ये ठेवल्याची माहिती आहे.
अकोला व अमरावती येथून जाणकारांना पाचारण केले. त्यांनी या प्राचीन जैन मूर्ती असल्याचे सांगितले. आणखी माहितीसाठी पुरातत्त्व विभागाला कळविले. या मूर्ती जैन धर्मीयांच्या असल्याचे निष्पन्न होते. माना गावामध्ये उत्खनन केल्यास आणखी काही मूर्ती मिळू शकतात. - कैलास भगत, ठाणेदार, माना
खोदकामात आठ फुटांवर पहिली मूर्ती आदिनाथ भगवंत, दुसरी मूर्ती नेमिनाथ भगवंत, तिसरी मूर्ती मुनिसुव्रत भगवंत यांची आहे. या मूर्ती पद्मासनमध्ये असून, हातावर हात आहे. त्यामुळे या मूर्ती जैन धर्मीयांच्या आहेत. यामध्ये आमदार हरीश पिंपळे यांचे सहकार्य लाभले. सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ठाणेदार यांच्या समक्ष खोदकाम केले. अजूनही मूर्ती निघू शकतात.- योगेश फुरसुले, सकल जैन समाज, मूर्तिजापूर