बुलडाणा : देऊळगाव राजा येथील स्वस्त धान्य दुकानदार संतोष निमोदियाच्या खून प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह जालना जिल्ह्यातून दोघांना अटक केली आहे. स्वतंत्र रेशनकार्ड बनवून देण्याच्या निमित्ताने मृतक संतोष निमोदिया आणि आरोपीमहीलेची जवळीक निर्माण झाली होती. त्यातून हे हत्याकांड झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अवघ्या ७२ तासात या खूनचा देऊळगाव राजा पोलिसांनी छडा लावला आहे. संतोष निमोदिया यांचे अपहरण करून १० जून रोजी खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या घटनेमुळे देऊळगाव राजा शहर परिसरात खळबळ उडाली होती. जालना-देऊळगाव राजा मार्गावर भीवगाव फाट्यानजीक असलेल्या डोंगरावर संतोष निमोदियाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी जालना जिल्ह्यातील शेवली येथून राधाकिसन उर्फ मन्नू खरात (रा. वाघरूळ, जि. जालना) आणि त्याच्या ट्रॅक्टरवरील चालक कैलास पाखरे (रा. वाघरूळ) यास गावातूनच मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. दरम्यान, महिलेस देऊळगाव राजा येथून ताब्यात घेतले आहे. संतोष निमोदिया याचे स्वस्त धान्याचे दुकान होते. त्याच्या दुकानावर लक्ष्मी विष्णऊ म्हस्के ( रा. देऊळगाव राजा) ही महिला धान्य घेण्यासाठी जात होती. दरम्यान, स्वतंत्र रेशनकार्ड बनवून देण्याच्या कारणावरून त्यांच्या मध्ये जवळीलक निर्माण झाली होती. मात्र नंतर संतोष निमोदियाचा त्रास वाढत गेला व स्वतंत्र रेशनकार्ड ही बनवून दिल्या गेले नाही. वाढता त्रास पाहता महिलेने तिचा नातेवाईक राधाकिसन ऊर्फ मन्नू खरात याच्या कानावर संपूर्ण प्रकार टाकला होता. त्यामुळे संतोष निमोदियाला राधाकिसन यांनी फोन करून बोलावून घेतले होते. कैलास पाखरे, लक्ष्ी म्हस्के आणि राधाकिसन उर्फ मन्नू खरात यांनी त्यास काठीने बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे आता समोर येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीनही आरोपींनी खूनाच्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. दरम्यान, त्यांना तीन वाजता देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवकलकार व त्यांचे सहकारी करीत आहेत.
मारहाण व बीपीच्या त्रासातून मृत्यू?
स्वस्त धान्य दुकानदार संतोष निमोदिया यास बीपीचा त्रास होता. त्यातच त्यात कैलास पाखरे, राधाकिसन खरात यांनी लाठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याला इजा झाली होती. सोबतच बीपीचा त्रास आणि मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झाल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.