अकोला : अवयव प्रत्यारोपण शक्य असल्याने रूग्णांना जगविण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे; पण उदासीन धोरण अन् नागरिकांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे अनेकदा अवयव संकलनाचे प्रयत्न फसत आहेत. याच अडचणींमुळे गत चार वर्षात जिल्ह्यात आतापर्यंत अवयवदानाचे तीन प्रयत्न फसले आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला २०१६ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्रात (नॉन-ट्रान्सप्लांट आॅर्गन री-ट्राइबल) नोंदणी करण्याची परवानगी मिळाली होती. त्या अनुषंगाने जीएमसीमध्ये ‘ब्रेन डेड ’ समितीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर समितीला तीन वेळा अवयव संकलनाच्या संधी मिळाल्या होत्या. त्यासाठी नागपूर येथील पथकही अकोल्यात दाखल झाले होते; पण तिन्ही प्रयत्न फसल्याने गत चार वर्षात एकदाही अवयव दान होऊ शकले नाही.ग्रीन कॉरिडोरची तयारी केली होती
- अकोला- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ग्रीन कॉरिडोरची निर्मिती.
- संकलीत अवयव घेऊन जाणाऱ्या वाहनासाठी जवळपास पाच किलो मीटरचा मार्ग मोकळा.
- वाहतूक मोकळी ठेवण्यासाठी पोलिसांचीही घेतली होती मदत.
या कारणांमुळे प्रयत्न होताहेत अयशस्वी
- नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव.
- रुग्ण बरा होण्याची नातेवाइकांना आस.
- अनेकांना ‘ब्रेन डेड’बद्दल योग्य माहितीच नाही.
आरोग्य विभागाची उदासीनताशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अवयवदान नोंदणी केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर सुरुवातीला जनजागृती करण्यात आली होती; मात्र त्यानंतर येथील समितीला अवयवदान जानजागृतीचा विसर पडल्याची वास्तविकता आहे. गत चार वर्षात जनजागृतीचे मोजकेच कार्यक्रम घेण्यात आले.ब्रेन डेड रुग्ण उपचाराने बरा होईल, अशी आशा प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकांना असते. ही भावनिक वेळ असते. अशा परिस्थितीत अवयव संकलनाचे कार्य कठीण असते. गत चार वर्षात तीन संधी मिळाल्या होत्या; पण अशाच कारणांमुळे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता, जीएमसी, अकोला.