अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प येथे भाड्याने रहिवासी असलेली एक महिला तिच्या तीन मुली व दोन मुलांसह दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या चाइल्ड लाइनद्वारे या मातेसह मुला-मुलींचा शोध घेण्यात येत आहे. यासोबतच या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनीही तपास सुरू केला आहे.सिंधी कॅम्पमध्ये शारदा ऊर्फ पद्मा घोडके या त्यांची मुलगी अंजली गणेश घोडके (११), जया गणेश घोडके (१०), कृतिका गणेश घोडके (७) आणि आणखी दोन मुले यांच्यासोबत सिंधी कॅम्पमध्ये भाड्याने राहत होत्या; मात्र काही दिवसांपूर्वी घरमालकाने त्यांना घराबाहेर काढले. त्यानंतर सदर मातेसह तिच्या तीन मुली व दोन मुले या सहा जणांचा पत्ताच लागत नसल्याची चर्चा सिंधी कॅम्प परिसरात आहे; मात्र या ठिकाणावरून गेल्यानंतर ही महिला अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर नगर येथे काही दिवस वास्तव्यास होती. त्यानंतर सदर महिला तिच्या मुली व मुले अद्यापही कुठे आहेत, हे समोर आले नाही. हे सहा जण गत अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने चाइल्ड लाइनद्वारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासोबतच आता खदान व अकोट फैल पोलिसांनीही या सहा जणांचा शोध सुरू केला आहे.
सिंधी कॅम्पमध्ये भाड्याने राहत असलेली ही महिला मुलांची योग्य काळजी घेत नसल्याची तक्रार लॉकडाउनच्या काळात करण्यात आली होती. यावरून चाइल्ड लाइन यांनी भेट देऊन पाहणी केली होती, तर पोलिसांनीही त्यांच्यावर नजर ठेवून मुलांची योग्य काळजी घेण्यात येते की नाही, हे वारंवार तपासले. सदर महिला बेपत्ता झाली नसून, ती कुटुंबीयांसह दुसऱ्या ठिकाणावर राहावयास गेली होती. या संदर्भात तिची चौकशी केली असता पोलीस कर्मचाऱ्यांसोबतही हुज्जत घालण्याचा प्रकार झाला होता; मात्र सदर महिलेचीच ती मुले असल्याने त्यांच्यावर बालगृहात ठेवणे किंवा इतर जबरदस्ती करणे योग्य नव्हते. पुढील तपास करत आहोत.- किरण वानखडे, ठाणेदार, खदान