अकोला, दि. ६- खदान परिसरातील बलोदे ले-आऊटमधील आनंद सागर अपार्टमेंटच्या एकाच मजल्यावरील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी भरदिवसा फोडून सुमारे एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, फ्लॅटमधील महिला या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्यानंतर अध्र्या तासाच्या आत ही चोरी केली. पोलिसांनी घटनास् थळावर श्वानपथक, ठसेतज्ज्ञ पथकांसह धाव घेतली. आनंदसागर अपार्टमेंटमधील महिला या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी सोमवारी दुपारी १२ वाजता नेहमीप्रमाणे गेल्या होत्या. घरी परत येण्यासाठी त्यांना अर्धातासाचा अवधी लागतो. याच अवधीचा फायदा घेत चोरट्यांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. १0२, १0३, १0५ च्या प्रवेशद्वाराचा कडीकोंडा लागोपाठ तोडला. १0५ मधील राजेश ढाकरे यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये रोख व आठ ग्रॅमची पोत, एक हजार रुपयाचा एक मोबाइल असा ऐवज लंपास केला. सचिन चव्हाण यांच्या फ्लॅट क्र. १0२ मधील १४ ग्रॅमची पोत, दहा हजार रुपये रोख तर नंदकिशोर नानोटे यांच्या फ्लॅट क्र. १0३ मधून चोरट्यांनी ४५ ग्रॅमची सोन्याची पोत, सात हजार रुपये रोख असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ज्यावेळी महिला घरी आल्या तेव्हा त्यांना फ्लॅटच्या प्रवेशद्वाराचा कडीकोंडा तोडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी खदान पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण केले. नंदकिशोर नानोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दा खल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, खदान पोलीस निरीक्षक गजानन शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मानसिंग चव्हाण यांच्यासह पथकाने भेट दिली.
भरदिवसा तीन घरे फोडली!
By admin | Published: February 07, 2017 3:30 AM